जगातली सर्वात मोठी जादू कोणती असेल तर ती म्हणजे “विश्वास.” हा विश्वास कधी देवावर असतो, कधी नशिबावर, तर कधी दुसऱ्या माणसावर. पण सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा विश्वास कोणावर ठेवायचा, तर स्वतःवर. आपल्या जीवनात अशी कितीतरी वेळा येतात जेव्हा सगळं काही धूसर वाटतं. स्वप्नं डोळ्यांसमोर असतात पण वाट दिसत नाही. कोणी म्हणतं – “तुला जमणार नाही,” “तू त्या स्तरावर नाहीस,” “इतके मोठे ध्येय तू गाठू शकत नाहीस.” आणि आपणही कधीकधी त्या आवाजांना खरं मानून शांत होतो. पण खरं सांगायचं झालं तर जगातली प्रत्येक मोठी गोष्ट त्या लोकांनी केली आहे ज्यांनी एक गोष्ट मनाशी ठेवल्यी — “मला माझ्यावर विश्वास आहे.”
आपल्या आजूबाजूला असंख्य उदाहरणं आहेत. कोणीतरी शून्यातून व्यवसाय उभा करतो, कोणीतरी अंधारातून प्रकाशाकडे जातो, कोणीतरी अपयशातही आपलं स्वप्न जिवंत ठेवतो. हे सगळं त्यांच्याकडे काहीतरी वेगळं होतं म्हणून नाही, तर ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले होते म्हणून होतं.
विश्वास म्हणजे काय?
तो एखादा शब्द नाही — तो एक भाव आहे,
जो तुम्हाला सांगतो की “तू जे ठरवलंस, ते तू करू शकतोस.”
हा विश्वास बाहेरून येत नाही, तो आपल्या आत वाढतो,
जसं बियाणं मातीत लपलेलं असतं पण योग्य वेळी अंकुरतं.
बालपणात जेव्हा आपण चालायला शिकतो, तेव्हा कोणी आपल्याला चालायला शिकवत नाही. आपण पडतो, रडतो, पुन्हा उभे राहतो, आणि पुन्हा प्रयत्न करतो. आपल्याला विश्वास असतो की “मी चालू शकतो.” तोच विश्वास मोठं झाल्यावर हरवतो —कारण आपण इतरांच्या मतांमध्ये अडकतो. लोक काय म्हणतील, हसतील का, नाकारतील का —या विचारांमुळे आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. पण लक्षात ठेवा, जगाचं मत दरवेळी बदलतं, पण स्वतःवरील विश्वास एकदा घट्ट झाला तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. कधीकधी जीवन इतकं कठीण होतं की वाटतं सगळं संपलंय. त्या क्षणी सगळे निघून जातात — मित्र, नातेवाईक, ओळखीचे. पण जो एक माणूस तुमच्या बाजूला राहतो, तो म्हणजे तुम्ही स्वतः. जेव्हा सगळे म्हणतात “हे शक्य नाही,” तेव्हा तुमचा स्वतःवरील विश्वास म्हणतो — “मी प्रयत्न तरी करीन.” आणि तोच प्रयत्न तुम्हाला तिथं नेतो जिथं तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही इतकं उंच जाता.
यश हे केवळ नशिबावर नाही, ते विश्वासावर उभं असतं. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असं शेकडो वेळा अपयशाचं पडसाद असतात. पण त्यांनी हार मानली नाही — कारण त्यांना माहिती होतं, “आज नाही जमलं, पण उद्या नक्की जमेल.” असंच काहीसं जीवन आहे — कधी वादळ येतं, कधी शांत सागर दिसतो. कधी वाट चुकते, पण आत्मविश्वास परत रस्ता दाखवतो. विश्वास म्हणजे तो दीपस्तंभ आहे, जो अंधारातही तुम्हाला तुमचं ध्येय दाखवतो. कधी विचार करा, जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तर इतरांनी का ठेवावा? जर तुम्हीच स्वतःला कमी समजत असाल, तर जग तुम्हाला उंच कसं बघेल? स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अहंकार नाही, तर आत्मज्ञान आहे. याचा अर्थ असा नाही की “मी सगळं करू शकतो,” तर “जे काही माझ्या हातात आहे, ते मी मनापासून करीन.”
एका शेतकऱ्याची गोष्ट आठवते —
एका वर्षी त्याचं सगळं पीक पावसाने नष्ट झालं. घरात काहीच उरलं नाही, पण त्याने पुन्हा शेत नांगरलं. लोकांनी विचारलं, “काय उपयोग? परत असंच होईल.” तो हसून म्हणाला, “माझ्या हातात पेरणं आहे, पाऊस देवावर, पण मेहनत माझ्यावर आहे.” हीच ताकद आहे विश्वासाची. तो शेतकरी जिंकतो — कारण त्याने भीतीवर नव्हे, विश्वासावर काम केलं.

जीवनात तुम्हाला अनेक वेळा असे क्षण येतील जेव्हा कोणाचंही पाठबळ नसेल, पण त्यावेळी स्वतःचं मनच तुमचं बळ बनावं गतं.
विश्वास हा बाहेरून मागायचा नसतो — तो तयार करायचा असतो, रोज थोडा थोडा. जसं दररोज सूर्योदय होतो, तसंच दररोज स्वतःशी संवाद करा. “हो, आजही मी प्रयत्न करीन.” “आज थकलो, पण थांबणार नाही.” “आज जमलं नाही, पण उद्या जमेल.” हे वाक्य दररोज स्वतःला सांगा — आणि बघा, तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा अपयश तुम्हाला धडा बनून भेटतं. लोकांची टीका तुम्हाला मार्ग दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं — तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, तो म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे “मी जग बदलणार” असं नव्हे, तर “मी स्वतःला ओळखणार” असं म्हणणं.
शेवटी इतकंच —
जगातला सगळ्यात जवळचा मित्र, सगळ्यात मोठा आधार, आणि सगळ्यात खरा साथीदार म्हणजे तुम्ही स्वतः. लोक येतील, जातील. परिस्थिती बदलेल. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तर कुठलंच वादळ तुम्हाला उखडू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ज्याने स्वतःला हरवलं नाही, त्याला कोणी हरवू शकत नाही.
अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची कथा वाचा – दूध पुरवठ्यातून घडवले उद्योगाचं साम्राज्य.
Share this content:
