Simple Is The New Best वर आपण अनेकदा अशा व्यक्तींच्या यशोगाथा वाचतो, ज्यांनी स्वतःच्या कष्टांवर आणि जिद्दीवर आपला मार्ग तयार केला आहे. पण आयुष्यात काही कथा अशाही असतात, ज्या एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात. त्या कथा असतात अनेक हातांनी उभ्या राहिलेल्या, अनेक मनांनी सांभाळलेल्या आणि एकीच्या बळावर पुढे गेलेल्या प्रवासाच्या. अशा कथा आपल्याला हे शिकवतात की यश म्हणजे फक्त वैयक्तिक प्रगती नाही, तर एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ताकद आहे. विश्वास, शिस्त आणि सातत्य या तीन गोष्टी एकत्र आल्या, तर साधी सुरुवातही मोठ्या वाटचालीत रूपांतरित होऊ शकते. शिरूर शहरातील वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची कहाणी ही अशाच एकत्रित प्रयत्नांतून उभी राहिलेली आहे. अनेक महिलांनी एकमेकांवर विश्वास ठेवून, बचतीपासून सुरुवात केली आणि आज एक मजबूत, विश्वासार्ह आर्थिक संस्था उभी केली. हा प्रवास आकड्यांपेक्षा माणसांवर आधारलेला आहे—आणि म्हणूनच तो अधिक प्रेरणादायी ठरतो.
सुरुवात : एक छोटी पायरी, मोठा विचार
२००५ साली ‘वैभवी’ नावाने एक महिला बचत गट सुरू झाला. सुरुवातीला हा प्रयत्न अगदी साधा होता. मात्र महिलांनी एकमेकींवर विश्वास ठेवला आणि हळूहळू एका मागोमाग एक असे १०० पेक्षा जास्त बचत गट तयार झाले. या सर्व बचत गटांनी एकत्र येऊन पुढे ‘वैभवी बचत गट महासंघ’ स्थापन केला. हा टप्पा केवळ आर्थिक नव्हता, तर महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि संघटनेचा पाया होता.
कल्पकतेतून प्रगतीकडे
२०१४ साली या प्रवासाला नवी दिशा मिळाली. वैभवी महासंघ दिनदर्शिकेची सुरुवात करण्यात आली. ही दिनदर्शिका केवळ तारखा सांगणारी नव्हती, तर महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायांना ओळख देणारी होती. या दिनदर्शिकेत महिलांच्या घरगुती आणि लघुउद्योगांची जाहिरात होऊ लागली. यामुळे महिलांच्या व्यवसायांना बाजारपेठ मिळाली आणि अनेक उद्योग अधिक जोमाने चालू लागले. बचत गटांमधून आर्थिक सुविधा मिळू लागल्या आणि महिलांचा आत्मविश्वास आणखी वाढला. जसजसे महासंघाचे काम वाढत गेले, तसतशी महिलांसाठी उपलब्ध असलेली आर्थिक मदत कमी पडू लागली. अडचण स्पष्ट होती, पण त्यातूनच नवा विचार पुढे आला.
शिस्त… मुंग्यांची, साठवणूक…मधमाश्यांची, कल्पकता…घरटं विणणाऱ्या सुगरणींची, अशा सहयोगातून साकारली पतसंस्था ही ‘वैभवी’ बचत गट महासंघाची.
या ब्रीदवाक्यावर आधारित, बचत गट महासंघानी स्वतःची पतसंस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ मे २०१६ रोजी ‘वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन झाली. ही शिरूर तालुका कार्यक्षेत्र असलेली पतसंस्था असून, तालुक्यातील पहिली महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली आणि पूर्णपणे महिलांकडून चालवली गेलेली पतसंस्था ठरली. ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारांची जागा न राहता, महिलांच्या एकीचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनली.
गुंतवणूक आणि बचतीसाठी आखलेल्या आर्थिक सुविधा
पतसंस्था स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी केवळ कर्जच नव्हे, तर सुरक्षित बचत आणि गुंतवणुकीचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले. वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये नियमित बचत योजना, मुदत ठेव, अल्प मुदतीच्या ठेवी यांसारख्या सुविधांमुळे महिलांना आपले पैसे सुरक्षित ठेवण्याची आणि वाढवण्याची संधी मिळू लागली. घरखर्च, मुलांचे शिक्षण, सण–उत्सव किंवा भविष्यासाठीची तरतूद—या सर्व गरजांसाठी महिलांना बचतीचे नियोजन करता येऊ लागले. संस्थेचा भर फक्त आकड्यांवर नसून विश्वासावर आहे. त्यामुळे महिलांना बचत करताना सुरक्षिततेची भावना मिळते आणि आर्थिक शिस्त लावण्याची सवय लागते. पारदर्शक व्यवहार, ठेवींवर मिळणारा योग्य परतावा आणि वेळेवर मिळणारी माहिती यामुळे महिलांचा संस्थेवरील विश्वास अधिक मजबूत होत गेला. वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था या सर्व बाबी लक्षात घेऊन महिलांसाठी विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून देते. अल्प कर्ज, व्यवसायासाठीचे कर्ज आणि गरजेच्या वेळी त्वरित मदत मिळावी यासाठी सोपी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे.
पतसंस्थे मध्ये विविध प्रकारच्या कर्ज सुविधा खालील प्रमाणे:
- सोने तारण कर्ज सुविधा: १२% व्याजदर (*अटी लागू)
- लघु कर्ज सुविधा
- मुदत ठेव तारण कर्ज (FD वर कर्ज)
- वाहन तारण कर्ज सुविधा
- वैयक्तिक कर्ज सुविधा
- स्थावर मालमत्ता तारण कर्ज (प्रॉपर्टी लोन)
- अल्प मुदत डेली कर्ज
याशिवाय ‘राजश्री महिला समृद्धी कर्ज योजना’ देखील उपलब्ध आहे (महिला बचत गटांसाठी).


संकटांमध्येही न डगमगणारी वाटचाल
नोटबंदी आणि कोरोना काळ यांसारख्या कठीण टप्प्यांतही वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने आपली वाटचाल थांबवली नाही. अडचणी असूनही शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासाच्या जोरावर संस्था पुढे जात राहिली. आज संस्थेला १० वर्षे पूर्ण होत असून दशकपूर्तीच्या या टप्प्यावरही कामकाज जोमाने सुरू आहे. सध्या संस्था १० कोटी रुपयांच्या ठेवींकडे वाटचाल करत आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला असून, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार हीच तिची खरी ओळख आहे.

केवळ आर्थिक संस्था नाही, तर सामाजिक व्यासपीठ
वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित नाही. महिलांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक सहभाग वाढवण्यासाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. दिनदर्शिका, महिला दिन, गौरी–गणपती सजावट स्पर्धा, डान्स स्पर्धा, होम मिनिस्टर, गरिबांसाठी दिवाळी फराळ वाटप, रक्तदान शिबिरात सहभाग, हळदी–कुंकू, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, मेडिकल चेकअप तसेच शिवजयंती आणि जिजाऊ जयंतीमध्ये सहभाग — या उपक्रमांमधून महिलांना एकत्र येण्याची, पुढे येण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते.
वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्थेची कथा हेच सांगते की साधी सुरुवात असली तरी एकी, शिस्त आणि पारदर्शकतेच्या जोरावर मोठी वाटचाल शक्य आहे. महिलांनी एकत्र येऊन उभारलेली ही संस्था आज अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. साधेपणातही किती मोठं यश दडलेलं असतं, हे वैभवीने कृतीतून दाखवून दिलं आहे.
तुम्हाला गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल, तर आमचा मध्यमवर्गीय लोकांनी गुंतवणूक का करावी? हा लेख नक्की वाचा.

वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था दहा वर्षे झाली वैभवी महिला बचत गट ते वैभवी महिला पतसंस्था ह्याचा मी एक साक्षीदार आहे सुरवातीला गट स्थापन करताना किती अडचणी आल्या बचत गटातून कोणी कर्ज घेतले ते वसुल करणे बचत गट संपल्यावर महिला किती तगादा लावायच्या हि तारेवरची कसरत संभाळत वैभवी महिला संचालकांनी आम्ही वैभवीच्या रणरागिणी म्हणून जबाबदारी चोखपणे बजावत महीला बचत गटातून वैभवी महिला पतसंस्था दहा वर्षी पुर्वी स्थापन केली आज दहा वर्षे संचालक मंडळ चांगले काम करत आहे सामाजिक बांधिलकी जपणारे महीला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले स्वतः च्या पायावर उभे करून स्वावलंबी बनवीले लघुउद्योग घरगुती लहान सहान व्यवसायात मदत करून महिला उद्योजिका झाल्या वैभवी महिला पतसंस्थेने विनम्र सेवा पारदर्शक कारभार यामुळे महिलांचा विश्वास संपादन केला आज दहा कोटींच्या वर ठेवी गेल्यावर पण वैभवी महिलांच्या डोक्यात हवा गेली नाही अहंकार नाही याला कारण वैभवी महिलांचा एकमेकीनवर असलेला विश्र्वास हि माझी पतसंस्था आहे हि भावना असो वैभवी महिला संचालक आणी पतसंस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे हितचिंतक आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा इंजिनिअर निखिल प्रताप महाजन आपण वैभवी ची यशोगाथा छान वार्तींकन/ मांडणी केली आहे तुम्हाला पण धन्यवाद
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे या उक्तीला प्रत्यक्षात अनुभव घेणाऱ्या सर्व वैभवी मनाच्या संचालिका सख्याच्या श्रमाचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा